X (ट्विटर) वरील Community Notes आता भारतात उपलब्ध! – MarathiTech
कम्युनिटी नोट्स नावाच्या सुविधेद्वारे एक्सवरील पोस्ट्स/ट्विट्सची सत्यता पडताळून त्यासाठी संदर्भ दिला जातो यामुळे एखादी पोस्ट खोटी किंवा चुकीची माहिती पसरवत असेल तर त्याच्या खाली Community Notes चा बॅनर दिसतो आणि तिथे ती पोस्ट का चुकीची आहे हे सांगत त्यासाठी संदर्भ दिला जातो जेणेकरून त्या व्हायरल ट्विटमधून खोट्या माहितीचा प्रसार कमी होईल.
आता आजपासून ही सोय भारतातसुद्धा उपलब्ध झाली असून यासाठी ते सध्या इच्छुक युजर्सना Contributor म्हणून Sign Up करण्यास लिंक उपलब्ध केली आहे. हे योगदानकर्ते एक्सवरील पोस्टस पाहताना एखादी चुकीची माहिती असलेली पोस्ट दिसली की त्यावरील चुकीच्या माहितीला उत्तर देत Fact Checking करून खऱ्या माहितीचा संदर्भासहित उल्लेख करत Community Notes डिस्प्ले करू शकतात. मात्र हे केवळ एकच युजर करेल आणि ती Community Notes लगेच दिसेल असं नाही. त्यासाठी इतर Contributors नी त्यावर सत्यता तपासून रेटिंग द्यावं लागतं जेणेकरून अनेकांकडून सत्यता पडताळली जाईल. यामुळे कम्युनिटी नोट्सचा गैरवापरसुद्धा आपोआप टाळला जातो.
कम्युनिटी नोट्स बद्दल अधिकृत माहिती : https://communitynotes.x.com/guide/en/about/introduction
लवकरच सुरू होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कम्युनिटी नोट्स नक्कीच खूप उपयोगी पडतील कारण बऱ्याच राजकीय पक्षांकडून आणि नेत्यांकडून त्यांच्या समोरील उमेदवार/नेत्यांबद्दल खोटी माहिती प्रसारित होते आणि ती फिरत फिरत WhatsApp, YouTube, फेसबुक अशा इतर माध्यमांवरसुद्धा पोहोचते.
याची सुरुवात २०२१ मध्ये Birdwatch नावाने झाली होती. इलॉन मस्कने २०२३ मध्ये याचं बदलून Community Notes असं केलं. या नोट्स आणि संदर्भ पूर्णपणे एक्सवरील युजर्सच देतात. एखाद्या संदर्भाला जितकं जास्त रेटिंग इतर Contributors कडून मिळेल त्याचीच Community Notes त्या ठराविक पोस्ट खाली दिसेल. यामुळे ते ट्विट करणाऱ्या राजकीय नेते किंवा सेलेब्रिटी किंवा सामान्य युजरकडून व्हायरल झालेलं चुकीचं यावर Community Notes कडून Context जोडलेला दिसेल.
एक्सवरील ही सोय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा जोडली गेली पाहिजे. Community Notes हे एक उत्तम Fact Check टूल म्हणता येईल. कम्युनिटी नोट्समध्ये आता आता ६९ देशांमधील योगदानकर्ते सहभागी झाले आहेत!